कुठेतरी आता अकस्मात एक अदृश्य दर्शन  दे 
देवा आता साजरा करायला एक सोहळा तरी दे 

आणि असे म्हणत, पाहता  पाहता भाद्रपद महिना येऊन ठेपला आणि सर्व संकटांवर मात करत आमचे बाप्पा खरंच दर्शन द्यायला हजर झाले. पुन्हा उत्सवाचे वातावरण पसरले आणि कार्यक्रमाची तयारी सुरु झाली.  श्रुसबरी ह्या बॉस्टन जवळील शहरात, गणेशोत्सव साजरे करण्याचे आमचे हे ९ वे वर्ष. 
यंदाच्या वर्षीचा चा गणेशोत्सव मात्र जरासा वेगळा. करोना महामारी मुळे जगभर सार्वजनिक सण साजरे करायला जे निर्बंध दिले गेले आहेत त्या नुसार आम्ही सुद्धा ह्या वर्षीचा सोहळा "virtual" म्हणजे आपापल्या घरातून करायचे ठरवले. नेहमीप्रमाणे लगबग आणि नियोजन काही महिने आधी पासून सुरु झाले. डिजिटल entertainment  ची नव-नवीन साधनं आत्मसात करून आम्ही कार्यक्रम करायला सज्ज झालो. 
ऑगस्ट ३० ला दुपारी २ वाजता, सर्व यंत्रणा "live" झाली, म्हणजे facebook live ह्या माध्यमातून व्हीडीओ द्वारे पूर्ण सोहळा रसिकांना पाहता आला. श्री. यतीन व सौ. स्मिता मांजरेकर ह्यांच्या घरी रीतसर पूजा झाली. छान सजावट, फुलांची आरास आणि तेजस्वी बाप्पाची मूर्ती पाहून सगळेच सुखावले.  स्मिताच्या आई वडिलांनी पूजा सांगितली व सर्व रसिकांना आणि भक्तांना घरी बसून पाहता आली आणि बाप्पा चे दर्शन घेता आले. "दुधाची तहान ताकावर" असा प्रकार जरी असला तरी, हे हि नसे थोडके म्हणत आम्ही ह्यातही आनंद घेतला. पूजे नंतर सामूहिक आरती सुद्धा छान पार पडली. अनेक देवांच्या आरत्या म्हणाल्या गेल्या आणि अनेक कुटुंब आपापल्या घरातून त्यात एका पाठोपाठ सामील झाली. मर्यादा पाळत त्यातल्यात्यात  जास्ती जास्त लोकांना सहभागी करून घेत आरती छान झाली. 
नंतर लगेचच करमणुकीचा कार्यक्रम सुरु झाला. पूर्णपणे आभासी (virtual ) कार्यक्रम करणे, रचणे आणि पाहणे हा आमच्या साठी आणि श्रोत्यांसाठी सुद्धा नवीनच अनुभव होता. सर्व पूर्व-ध्वनी मुद्रित करून ठेवलेल्या चित्रफिती तयार होत्या. कार्यक्रमाचे सूत्र संचालन मात्र "live" होते. अश्या स्वरूपाचा कार्यक्रम असल्याने ह्या वर्षीचे नावीन्य म्हणजे महाराष्ट्रातून अनेक प्रसिद्ध लोकांना आम्हाला सामील करून घेता आले. कार्यक्रम "retro to metro" ह्या theme वर आधारित होता. मराठी आणि हिंदी मधील प्रसिद्ध सिनेमांवर आधारित नाटुकली तयार करण्यात आली. आपल्या जवळच्या मित्र मैत्रिणींना पडद्यावर पाहून सर्वांना छान वाटलं. मराठी चित्रपटांमध्ये, सचिन पिळगावकर यांचे  "अष्टविनायक", "आत्मविश्वास", आणि "अशी हि बनवा-बनावी" ह्यांचा समावेश होता. तर हिंदी मधे "शोले", "मैने प्यार किया" आणि "थ्री इडियटस" ह्या तीन चित्रपटांवर आधारित गाणी आणि नाटुकली करण्यात आली. आपापल्या घरी सर्वानी उत्साहानी आणि भरपूर मेहेनत घेऊन चित्रफिती तयार केल्या होत्या. कार्यक्रमाचे, वर नमूद केल्या प्रमाणे, मुख्य वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातून, सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक, सिनेमा दिग्दर्शक, गायक, श्री. डॉ.  सलील कुलकर्णी ह्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या, त्याच बरोबर श्री. अशोक हांडे (मराठी बाणा ) ह्यांची सुद्धा गणपतीची गाणे गाऊन त्यांच्या  शुभेच्छा आमच्या ISW गणेशोत्सव मंडळाला  पाठवल्या. श्री. सुधीर गाडगीळ ह्यांची त्यांच्या अनोख्या शैलीत पु ल देशपांड्यांची आठवण सांगत, कार्यक्रमाची रंगात वाढवली. नंतर प्रसिद्ध सिनेमा लेखक, दिग्दर्शक, "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "शूट आऊट आट  वडाळा ", "वजीर", "आणि डॉ. काशिनाथ घाणेकर" ह्या सारखे दर्जेदार चित्रपट करणारे  श्री. अभिजित देशपांडे, ह्यांच्याशी साधलेला संवाद प्रदर्शित झाला. अभिजित देशपांडेंनी या गप्पांमधून  त्यांचे अनुभव, आठवणी, अभिताभ बच्चन सारख्या मोठ्या लोकां  बरोबरचे अनुभव संगितले . मुलाखत खूप रंगली. त्यांनतर मुलींनी केलेला एक बहारदार नृत्याचा कार्यक्रम रसिकांना खूप आवडला. 
 तब्बल २ तासांचा असा online/virtual कार्यक्रम कोणत्याही तांत्रिक अडचणी न येता अगदी प्रभावी पणे पार पडला.  डिजिटल एंटरटेनमेंट चे हे  आगळे वेगळे माध्यम आता अंगवळणी पडतेय असे वाटते. Virtual कार्यक्रम प्रभावी आणि रसिकांना खुश करणारा झाला यात वादच नाही. माणूस खूप परिवर्तनशील असतो, आणि तो  परिस्थिती प्रमाणे   बदल आत्मसात करतो.  त्यामुळे यंदाच्या  ह्या covid च्या परिस्थिती मध्ये साजरा  केलेला  हा उत्सव  आपल्या  सर्वांच्याच  लक्षात राहील. 
मनात हे बदलेले जग कायम घर करून राहणार... पुढल्या वर्षी मात्र हे जगभरातले सर्व चिंतेचे सावट दूर झालेले असेल, आणि आम्ही पुन्हा पूर्वी सारखे, नटून थटून, भरपूर ढोल-ताशांचा आवाज करत बाप्पांचे स्वागत करू आणि पंगती सकट, मोदक, श्रीखंडाचा भरपूर आस्वाद घेऊ  अशी सगळे  आशा करूया .. 
संस्कृती आणि परंपरा ही, काळ, परिस्थिती, माणसं, …माणसांची हौस ह्यांच्या पलीकडे असते.  काळ, बदलतो, परिस्थिती बदलते, माणसं  बदलतात, पण भावना, परंपरा, आणि सोहळे हे कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सुरूच राहतात, आणि  सुरूच राहणार.....